जम्मू, ८ जून २०१७:
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय ह्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांचा सुरूच आहे. मात्र सदैव सतर्क असणाऱ्या भारतीय जवानांनी गुरुवारी घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना टिपून ठार मारले. यावेळच्या धुमश्चक्रीत भारताचा एक जवानही शहीद झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमधील नौगाम भागात नियंत्रण रेषेवर काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. बुधवारीही जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या काही नक्षलवाद्यांचा भारतीय जवानांनी खातमा केला होता. गेल्या दोन दिवसांत भारतीय जवानांनी कुपवाडा भागात दहशतवाद्यांचे घुसखोरीचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत.
दरम्यान, हिवाळ्यात सीमेवर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होत असल्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्य काळात दहशतवादी सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करीत असतात. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र सतर्क भारतीय सेनेने पाकिस्तानच्या दिशेने होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी सातत्याने हाणून पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.