नवी मुंबई, 7 जून 2017/AV News Bureau:
3 जुलै रोजी होणाऱ्या लोकशाही दिनी सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपले अर्ज 17 जूनपर्यंत पालिका प्रशासनाकडे सादर करावेत, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
अर्जदाराने अर्जात नमूद केलेली तक्रार वा निवेदन हे वैयक्तिक स्वरुपात असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जादाराने संबंधित विषयाबाबात याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. यामध्ये – न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल, सेवाविषयक – आस्थापनाविषयक बाबी याबाबातचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याशिवाय तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमूना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गावठांण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य मिळणार आहे. शिवाय नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ Website -(www.nmmc.gov.in) यावरील फर्म्स वा अर्ज विभागातून अर्ज नमूना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.