केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कोकणवासियांना आश्वासन
सावित्री नदीवरील नव्या पुलाचे लोकार्पण
रायगड, 5 जून 2017/AV News Bureau:
कोकणच्या विकासासाठी मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन महाराष्ट्र शासनाने तातडीने करुन दिल्यास डिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाड येथे दिले. कोकण रस्ते विकासाच्या महत्वाच्या कामांचे भुमिपूजन आणि सावित्री नदीवरील नव्या पुलाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
महाड पुल दुर्घटना ही संवेदनशील, मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये या करीता त्यांच्या विभागामार्फत अशा जुन्या झालेल्या देशातील सर्वच पुलांचा सर्व्हे करुन त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरणांतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील 12 पॅकेजेस पैकी इंदापूर ते वडपाले, वीर ते भोगाव खुर्द व भोगाव खुर्द ते कशेडी घाट पर्यंतच्या रस्त्यांची कामे या तीन पॅकेजेसचे भुमिपूजनही आज करण्यात आले. किल्ले रायगड पर्यंतच्या रस्त्याची कामे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या गावा पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भुमिपूजनही करण्यात आले.
कोकण विकासासाठी होत असणाऱ्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम आम्ही तातडीने संपवू. यासाठी सर्व मिळून एकत्रित पाठबळ देऊ. हा महामार्ग भविष्यात कोकणाच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा असून प्रसंगी कोकणचे भाग्य बदलणारा होईल. कोकण विकासासाठी कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाड जंक्शन ते रायगड किल्ला (जिजाऊ माता समाधी पर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणी वाडी पर्यंत) चा दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रिट रस्त्याच्या बांधणीसाठी 247. 13 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रिट रस्ता बांधणीसाठी 412.02 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.