मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरळीत
नवी मुंबई, 5 जून 2017/AV News Bureau:
संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगांच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पाचव्या दिवशीही संप सुरूच ठेवून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे कृषी मालाच्या व्यवहार ठप्प झाले असले तरी वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाला आणि इतर कृषी माल घेवून येणाऱ्या 800 वाहनांची आवक झाली आहे. त्यामुळे राज्यभर संप असला तरी मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा होणार आहे.
शेतकऱ्यांनी 1 जूनपासून आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कोअर टीमने मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे काही शेतकरी संघटनांचे समाधान झाले नाही. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी काल पुणतांबा येथे झालेल्या बैठकीत केला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देत शेतकऱ्यांमध्ये फूट पाडल्याचा आरोप करीत, जोपर्यंत मुख्यमंत्री घोषणांऐवजी आपल्या निर्णयाची अंमलबाजवणी करीत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार नाशिक, पुणतांबा येथील शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, शेतकरी सपाची पुढील रणनिती ठरविण्यासाठी येत्या 8 जूनला नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. तोपर्यंत संपावर तोडगा न निघाल्यास कृषीमालाच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होवून दर कडाडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे
भाज्यांच्या दरात घट तर कांद्याच्या दरात वाढ
आजच्या महाराष्ट्र बंदमधून मुंबईला वगळण्यात आल्यामुळे नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. पाचही बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळित सुरू आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाज्यांचे दर 50 टक्यांनी कमी झाले आहेत. दुपारी 1 पर्यंत बाजारात 455 गाड्यांची आवक झाली आहे. यामध्ये 70 टक्के भाजीपाला परराज्यातून आणि 30 टक्के भाजीपाला राज्यातून दाखल झाला आहे. तर कांदा बटाट मार्केटमध्ये 70 गाड्या कांदा आणि 60 गाड्या बटाटे दाखल झाले आहेत. कांदा आणि बटाट्याला मागणी नसल्यामुळे दरांमध्ये दोन रूपयांनी वाढ झाल्याची माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली. तसेच फळ मार्केटममध्येही 300 गाड्यांची आवक झाल्याचे फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.