राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई, 2 जून 2017/AV News Bureau:
शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचे हत्यार उपसणे ही देशाच्या इतिहासातील अभुतपूर्व पण सरकारच्या दष्टीने नामुष्कीची घटना आहे. राज्यातील या परिस्थितीस केवळ सध्याचे सरकार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचे धोरण सध्याच्या राज्य सरकारचे असल्याने शेतकरी संपावर गेला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
एकीककडे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथन यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी दिली.मात्र महाराष्ट्र सरकारने येथील शेतकऱ्यांना तोच न्याय दिला नाही, असा टोलाही पवार यांनी मारला.
संपूर्ण कर्जमाफी होत नाही. इतर मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली एकी आणि आंदोलन कायम ठेवावे. अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत संकेत देऊन सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकरी बांधवांनी आपल्या भूमिकेवर ठाम रहावे,असे शरद पवार म्हणाले.
- दूध,भाजीपाला रस्त्यावर फेकू नका
शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मी समजू शकतो. मात्र रस्त्यावर दूध ओतणे, भाजीपाल- फळे रस्त्यावर टाकून निषेध करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे.दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून वाया न घालवता गावामधील गरीब घटकांना वाटप करावे आणि गावातील सामान्य लोकांची व आपली नाळ भक्कम करावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.