नवी मुंबई, 2 जून 2017/AV News Bureau:
कर्जमाफी तसेच इतर मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे कृषी मालाच्या पुरवठ्यावर कमालीचा विपरित परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी आपला कृषी माल शहरांमध्ये पाठविला नसल्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. अनेक भाज्या उपलब्धच झालेल्या नाहीत तर ज्या काही थोड्या प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे दर साधारणपणे दुप्पट म्हणजे 20 ते 60 टक्क्यांनी कडाडल्याचे घाऊक बाजारातील दरांवरून स्पष्ट होत आहे. भाजीपाल्याचा पुरवठा मंदावल्याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपावर त्वरीत तोडगा निघाला नाही,तर परिस्थिती आणखी चिघळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
- वाशीच्या बाजारात आज कांद्याची एकही गाडी आलेली नाही. त्यामुळे घाऊक बाजारातील कांद्यांच्या दरांमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. लसणीचे दर अद्याप स्थिर आहेत. मात्र भेंडी, फरसबी, शिमला मिर्ची, कोबी,हिरवा वाटाणा पालक, मेथीसह बाजारात दाखल झालेल्या सर्वच भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात तर त्यांचे दर आणखी कडाडण्याची भिती आहे.
- बाजारात दाखल न झालेल्या भाज्या
- भुईमूग शेंगा, आले, अरवी, बीट, दुधी भोपळा, चवळी शेंगा, ढेमसे, गवार, घेवडा, कोहळा, रताळी, शिराळी दोडकी, सुरण, वालवड, वांगी काटेरी, वांगी गुलाबी, वांगी काळी, कढीपत्ता, मुळा, पुदीना, शेपू या भाज्या आज बाजारात दाखल झालेल्या नाही.
- घाऊक बाजारातच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांचे दर कडाडल्यामुळे किरकोळ बाजारात तर भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची भिती निर्माण झाली आहे. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात संपाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या भाजीपाल्यांचे दर आमच्या वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत.
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत १ जून आणि २ जून रोजी दाखल झालेल्या भाजीपाला आणि त्यांचे दर पुढीलप्रमाणे