राज्यातील 55 हजार औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी
नवी मुंबई, 30 मे 2017/AV News Bureau:
बेकायदेशीररित्या चालविणाऱ्या जाणाऱ्या ऑलनाइन फार्मसी आणि केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटुंब मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध केलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात आज अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रातील 55 हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. आज रात्री 12 वाजेपर्यंत औषधांची दुकाने बंद राहणार आहेत.
राज्यात ई फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू आहे. त्यातून नोर्कोटीक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, सिरप अशी अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र याबाबत ठोस कारवाई केली जात नाही, अशी तक्रार राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली.
ऑनलाइन फार्मसीला विरोध का ?
- औषधांच्या दुष्परिणामापासून सामान्यांना वाचविणे.
- कमी दर्जाच्या अप्रमाणित, डुप्लिकेट औषधे पसरण्याची भिती
- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एन्टीबायोटीक्स, वेदनाशामक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळणे
- युवकांमध्ये नशेच्या औषधांच्या वापराचा मोठा धोका
- ग्रामीण भारतात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
- देशातील 8 लाख औषध विक्रेते आणि 40 लाख कर्मचाऱ्यांच्या परिवारावर आर्थिक संकट
- सक्षम प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात अभाव
- अलोपथी औषधांच्या वापरास सक्षम डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
- अपूर्ण यंत्रणा व मनुष्यबळ याचा फायदा उचलून सायबर क्राइमचा मोठा धोका
- इंटरनेट, नेटवर्क, इलेक्ट्रीसिटी यांसारख्या सुविधांमध्ये येणाऱ्या अडचणी
रशिया, जपान, इटली, चीन आदी देशांमध्ये ऑनलाइन औषध विक्री होत नसल्याचा संघटनेचा दावा
ऑनलाइन औषध विक्रीमुळे अनेक देशांमध्ये सायबर क्राइमचे दुष्परिणाम समोर आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आपले म्हणणे मांडण्यासाठीच आम्ही आजचा बंद केला आहे. याप्रकरणी आज प्रत्येक जिल्हापातळीवर कलेक्टरना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे दिलीप देशमुख यांनी दिली.