झिका आजाराबाबत घाबरू नका

आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई,29 मे 2017/AV News Bureau:

झिका या  आजाराचा विषाणू राज्यात आढळून आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली. झिका हा आजार किटकजन्य आहे. त्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही, असेही   आरोग्यमंत्री डॉय सावंत यांनी स्पष्ट केले.

  • झिका आजाराची लक्षणे

झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. परंतु पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असे सावंत यांनी सांगितले.

  • डास निर्मूलन मोहीम राबवावी

हा आजार झालेल्या  रुग्णांनी पुरेशी  विश्रांती घ्यावी तसेच निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. तापाकरिता पॅरासिटामोल हेच औषध वापरावे. एस्पिरिन अथवा एन. एस. ए. आय.डी प्रकारातील औषधांचा वापर करू नये. झिका आजाराचा प्रसार एडीस या डासापासून होत असल्याने नागरिकांनी घर, सोसायटी परिसरात डास निर्मूलनाची मोहीम हाती घ्यावी. डास होणार नाहीत यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.