मुंबई, 29 मे 2017/AV News Bureau:
राज्याच्या किनारपट्टी भागातील माशांची संख्या योग्य प्रमाणात रहावी तसेच मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी 1 जुन ते 31 जूलै या काळात सागरी किनारपट्टीपासून 12 मैलापर्यंत यांत्रिकी नौंकांवरून पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे.
पावसाळी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या नौकांना लागू असणार आहे. पारंपारीक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. बंदी कालावधीच्या दरम्यान यांत्रिकी मासेमारी नौका मासेमारी करतांना अढळल्यास ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम’ अंतर्गत जहाज आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे.
बंदी कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळतो आणि मासळीच्या साठ्याचे जतन होते. याशिवाय पावसाळ्यातील खराब वादळी हवामानामुळे मच्छिमारांच्या जिवातासही धोका पोहोचू शकतो.
- …तर नुकसान भरपाई नाही
या कालावधीच्या दरम्यान ज्या संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करतांना आढळतील अशा संस्थांचे पुरस्कृत केलेले अर्ज ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम’ योजनेच्या लाभाकरीता विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळी मासेमारी करताना अपघात झाल्यास यांत्रिकी मासेमारी नौकेस शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. 1 जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना 1 जून नंतर कोणत्याही परीस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी नसून अशा नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई यांनी स्पष्ट केले आहे.