उद्या 1 वाजता बारावीचा निकाल

पुणे, 29 मे 2017/AV News Bureau:

गेल्या अनेक दिवसांपासून 12 वीच्या निकालाबाबत असलेली संभ्रमावस्था आज संपली. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइनपद्धतीने 12 वीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य शिक्षण मंडळाने आज केली.

बारावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. मात्र बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीखच अद्याप जाहीर होत नव्हती. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मिडियावरून वेगवेगळ्या तारखा सांगणारे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने नेमकी तारीख जाहीर करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. शनिवारी राज्य शिक्षण मंडळाने सोमवारी 12 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज 12 वीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

बारावीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातुर, नागपुर आणि रत्नागिरी या नऊ विभागांमार्फत घेतली गेली. राज्यभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी 12 वीची परीक्षा दिली आहे.