मुंबई , 6 डिसेंबर 2016:
साऱ्या जगाला वेड लावणाऱ्या सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत काम करण्यासाठी बॉलिवूडची टॉपची मंडळी आसुसलेली असते. मात्र या सुपरस्टारला बॉलिवूड स्टार सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. रोबोट चित्रपटाचा दुसरा भाग 2.0 च्या टिजर लॉंचच्यावेळी रजनिकांत यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली.
रजनिकांत यांचा 2.0 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार अक्षय कुमार प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत चमकणार आहे. सैतानाच्या रुपात दिसणारा अक्षय कुमारचे या चित्रपटातील नाव द क्रो असे आहे. या चित्रपटात अक्षय कुमार रोबोट बनलेल्या सुपरस्टार रजनिकांत यांच्याशी दोन हात करणार आहे.
2.0 चित्रपटाच्या टीजर लॉंचिगच्यावेळी रजनिकांत, अक्षय कुमार, एमी जॅक्सन आणि दबंग अभिनेता सलमान खानसह बॉलिवूडमधील सगळे दिग्गज उपस्थित होते.
सलमान खानने बोलताना सांगितले की, मला या कार्यक्रमाला बोलावले नव्हते. परंतु रजनी सरांना भेटण्यासाठी मी ‘ बिन बुलाए मेहमान की तरह ‘ आलो आहे. रजनिकांत यांच्यासोबत माझी भेट वॉशरुममध्ये झाली होती. त्यावेळी मी त्यांना त्यांच्या प्रसिद्ध सिगरेट एक्टविषयी विचारले होते. तेव्हा रजनिकांत यांनी बॅकस्टेजवरच सिगरेट एक्ट करून दाखविली. ते पाहून मी चकीत झालो होतो.
त्यावर बोलताना रजनिकात म्हणाले की, मला सलमानसोबत काम करण्याची इच्छा आहे. सलमानची इच्छा असल्यास मी आताच त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे.
चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारने रजनिकांत यांना एक्टींगची गॅलेक्सी म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये सणासुदीच्या दिवसात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धा लागते. मात्र रजनिकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजेच एक सण असल्याचे सांगितले.
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी सांगितले की, 2.0 हा चित्रपट हॉलिवूडच्या दर्जाचा चित्रपट आहे. रोबोट चित्रपटाच्या मालिकेतील 3.0 आणि 4.0 चित्रपटही बनवणार आहे.