नवी मुंबई, 23 मे 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात आल्या आहेत. आज पार पडलेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या ऋचा पाटील यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यामध्ये 8 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, 6 सदस्य शिवसेनेचे तर भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. सभापतीपदासाठी दोन्ही बाजूंकडून अनेक बड्या नेत्यांची नावे होते. मात्र राष्ट्रवादीने शुभांगी पाटील यांना तर शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली. शिवसेनेला भाजपचे एक मत मिळणार होते. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसचे मत आपल्या पारड्यात पडावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसच्या मीरा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांना 9 तर शिवसेनेच्या ऋचा पाटील यांना 7 मते मिळाली.
गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या एका सदस्यला मतदानाचा हक्क नाकारल्यामुळे तसेच काँग्रेसने शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे महापालिकेत मोठा पक्ष असूनही राष्ट्रवादीला स्थायी समिती सभापतीपदापासून वंचित रहावे लागले होते. मात्र यावेळी काँग्रेसकडून मिळालेली साथ आणि स्वपक्षाच्या सर्वच सदस्यांना मतदान करता आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा स्थायी समितीवर आपला कब्जा मिळवला आहे.