मुंबई, 17 मे 2017/AV News Bureau;
योगगुरू रामदेव बाबा यांनी आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र योगगुरू रामदेव बाबांच्या या ‘राज’कीय भेटीने मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
योगाचा प्रसार करणाऱ्या रामदेव बाबा यांनी स्वदेशीचा प्रोत्साहन देणार असल्याचे स्पष्ट करीत पतंजलीसारख्या उत्पादन निर्मितीमध्ये पाऊल टाकले आहे. आणि अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत भक्कम पाय रोवले आहेत. त्यामुळे योगानंतर पतंजली उत्पादन आणि आता रामदेव बाबा राजकारणातही सक्रीय होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
रामदेव बाबा यांनी आज सकाळी नऊच्या सुमारास राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी दाखल झाले. दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
रामदेव बाबांचे भाजपशी चांगले संबंध आहेत. अशात मनसे अध्यक्षांची सदिच्छा भेट घेण्यामागचे कारण काय, याबाबत आता मुंबईच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे रामदेव बाबा यांनी ट्विटरवरून महिती दिली.