मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
16 मे 2017 /AV News Bureau:
मुंबईतील गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई परिसरात राबविण्यात येणाऱ्या भाडेतत्वावरील घरांच्या सर्व योजनांमध्ये गिरणी कामगारांसाठी 50 टक्के वाटा ठेवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे घरांसाठी झगडणाऱ्या गिरणी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गिरणी कामगारांना घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या नव्या निर्णयामुळे गिरणी कामगारांना आणखी 7 हजार 700 घरे मिळणार आहेत. तर आधीच 320 चौ.फुटाची 10 हजार 768 घरे मंजूर झाली आहे. त्यामुळे या नव्या घरांसह गिरणी कामगारांना मिळणाऱ्या एकूण घरांची संख्या 18 हजार 468 इतकी होणार आहे.
राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनाही राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यामध्ये गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी भाडेतत्वारील घरांच्या योजनांमध्ये गिरणी कामगारांना अधिकाधिक सामावून घेण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. याबाबतचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.