पनवेल स्मार्ट शहर बनवणे हाच उद्देश

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

पनवेल, 16 मे 2017/AV News Bureau:

पनवेल शहर हे एक स्मार्ट शहर बनवणे, हाच पनवेल महापालिकेला मंजुरी देण्याचा उद्देश होता. त्यामुळे हा उद्देश सफल करण्यासाठी या महापालिका निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

पनवेल महापालिकेतील नागरिकांच्या गरजा आणि सुचनांचा विचार करून, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या “दशमान योजनेवर आधारित जाहीरनाम्याचे मंगळवार,16 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात जाहीरनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील मुळचे नागरिक आणि रोजगारानिमित्त बाहेरून या परिसरात वास्तव्यास आलेल्या रहिवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली पाहिजे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सबका साथ, सबका विकास या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी झटले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे  विश्वस्त महेश बालदी, भाजपाचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल आदीं उपस्थित होते.

 पनवेल महापालिका निवडणूक जाहीरनाम्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये

                      दशमान योजना

            १) २४ तास पाणीपुरवठा

            २) सांडपाण्यावर प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर

            ३) रस्ते आणि पायाभूत सुविधा

            ४) गरजूंसाठी स्वस्तात दर्जेदार गृहनिर्माण योजना

            ५) महापालिका शाळांचे दर्जेदार नेटवर्क उभारणार

            ६) स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा

            ७) अत्याधुनिक क्रीडा सुविधा

            ८) उद्याने आणि पर्यावरण विकास

            ९)सांस्कृतिक विकास

            १०)पारदर्शी आणि कार्यक्षम प्रशासन

 

  • या शिवाय शहरासाठी स्वतंत्र बस परिवहन सेवा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बस टर्मिनल्सची उभारणी करण्याचे आश्वासनही जाहीरमान्यात देण्यात आले आहे.
  • महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांवर गतिमान आणि सिग्नल विरहित प्रवासासाठी ग्रेडसेपरेटर्स, पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक, झेब्रा क्रॉसिंगसाठी अलार्म यंत्रणा,सरक्षेसाठी सीसीटीव्ही, तसेच खड्डेविरहीत रस्त्यांसाठी काँक्रीटच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ड्रेनेज लाइन तसेच विविध युटीलीटी केबल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.