परळी बाजार समिती  निवडणुकीत पंकजा मुंडेंना धक्का

धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 18 पैकी 14 जागा पटकावल्या

परळी (बीड), 15 मे 2017/AV News Bureau:

परळी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 18 पैकी 14 जागा पटकावत भाजपचा पराभव केला. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. गेली तीन दशके परळी बाजार समितीवर स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या गटाचे वर्चस्व होते. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंचा वरचष्मा होता. गेल्या काही काळामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादामुळे परळीतील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. यापार्श्वभूमीवर  परळी बाजार समिती निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती.आता पुन्हा झालेल्या निवडणुकीतही धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवारांना चारीमुंड्या चीत करीत पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.