खा. अशोक चव्हाण यांची टीका
उद्यापासून राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रसचा इशारा
मुंबई, 11 मे 2017:
राज्यातील तूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करीत आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असेही चव्हाण म्हणाले.