उपायुक्त संदीप मळवी जखमी, दोघांना ताब्यात घेतले
ठाणे, 10 मे 2017/AV News Bureau:
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप मळवी यांच्यावर संतप्त जमावाने आज हल्ला केला. या हल्ल्यात मळवी जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हजर करण्यात आले.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप मळवी आपल्या पथकासह आज सायंकाळी 7 च्या सुमारास गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील एकवीरा पोळी भाजी केंद्राच्या बाहेर अस्ताव्यवस्तपणे सामान पडले होते. मळवी यांनी सामान ताब्यात घेण्यास सुरूवात केली, तेव्हा पोळी भाजी केंद्राचे चालक पी. देशपांडे आणि मळवी यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी देशपांडे यांनी मळवी यांना धक्काबुक्की केली. या मारहाणीत मळवी यांचे कपडे फाटले तसेच त्यांच्या हाताला आणि पाठीवर जबर मार लागला. या घटनेनंतर परिसरात फेरीवाले आणि रिक्षा चालकांची पळापळ झाली. त्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात मळवी यांना मार लागला असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकऱणी नौपाडा पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन जणांना अटक केली आहे.