निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई

लेखी खुलासा न देणाऱ्यांचे निलंबन करण्याचा इशारा

पनवेल, 8 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालका निवणुकीच्या प्रशिक्षणास 7 मे रोजी गैरहजर राहिलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक अधिकारी व महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहेत. 12 मे रोजी लेखी खुलासा देण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांचे निलंबन करण्याबरोबरच वेतनवाढही रोखण्यात येणार आहे.

प्रथमच होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी पनवेल महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने 7 आणि 19 मे रोजी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र 7 मे रोजी झालेल्या पहिल्याच प्रशिक्षण वर्गास अनेक कर्मचारी तसेच अधिकारी गैरहजर होते. ही बाब निवडणुकीविषयक नियमातील तरतुदींचा भग करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त निंबाळकर यांनी दिले  आहेत.

7 मे रोजीच्या प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेखी खुलाशासह 12 मे रोजी सकाळी 10 वाजता महापालिका मुख्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.  जे कर्मचारी व अधिकारी खुलाशासह हजर राहणार नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी रोखण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधितांविरोधात निवडणूक नियमानुसार प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवडणूक अधिकारी व महापालिका आयुक्त निंबाळकर यांनी दिला आहे.