केंद्रीय कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा
मुंबई, 8 मे 2017/AV News Bureau:
तूर डाळ खरेदीवरून राज्यात राजकारण चांगलेले पेटलेले असतानाच अतिरिक्त एक लाख टन तूर डाळ 31 मे पर्यंत नाफेडमार्फत खरेदी करण्यास केंद्र सरकारने आज परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली आणि राज्यात तूर खरेदीबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. राज्यात तूरीचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील जास्तीत जास्त तूर खरेदी केली जावी साठी महाराष्ट्राने 2 लाख टन तूर खरेदीची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र सध्या 1 लाख टन तूर खरेदीची परवानगी दिल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आणखी एक लाख टनाची परवानगी मिळवण्ये प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिलपर्यंत होती. मात्र मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. विरोधी पक्षांनीदेखील शेतकऱ्यांकडील सर्व तूर खरेदी करण्यासाठी मुदत वाढवावी, अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय कृषीमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर 31 मेपर्यंत तूर खरेदीला मान्यता मिळाली आहे. दरम्यान, तूर खरेदीला मान्यता मिळाली असली तरी तेवढ्या प्रमाणात बारदाने उपलब्ध होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.