जीएसटीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचा केंद्राला इशारा
मुंबई, 4 मे 2017 /AV News Bureau:
केंद्र सरकारने देशभरात जीएसटी (GST) कर पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र (GST)जीएसटीमुळे मुंबई महापालिकेचे अस्तित्वच संकटात येणार असेल शिवसेना स्वस्थ बसणार नाही. महापालिका अबाधित राहिली नाही तर शिवसेनेला पुर्नविचार करावा लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
देशात लवकरच लागू होणाऱ्या (GST)जीएसटीसंदर्भात काल शिवसेना भवनात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत जीएसटी(GST) आणि महापालिकांच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्यात आली.
देशात जीएसटी(GST) लागू झाल्यानंतर महापालिकांची स्वायत्तता अबाधित राहते की नाही? शिवसेना त्याकडे शिवसेना अत्यंत बारकाईने लक्ष देईल. याप्रकरणी लाचार होऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
- निवडणुकीच्या तयारीला लागा
जीएसटीबाबत 20 मे रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत जीएसटीच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेना करणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर प्रश्नावर शिवसेना पुन्हा आक्रमक होणार आहे. त्यासाठी राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्याबाबत गांभिर्याने विचार सुरू आहे. राज्यातील सरकार निरुपयोगी असल्याची टीका करीत निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्याचे बोलले जात आहे.