उत्तरप्रदेश आणि दिल्लीची पुनरावृत्ती कामोठ्यात होणार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास

पनवेल,28 एप्रिल 2017/AV News Bureau:

जिथे जाल तेथे भाजपचा विजय होत आहे. उत्तरप्रदेश आणि दिल्लीची पुनरावृत्ती कामोठ्यात होणार आहे. भाजप बदल घडवत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधींची कामे झाली असून यापुढेही अनेक बाबींमध्ये बदल घडवायचा आहे. या विकासयात्रेमध्ये चांगले यात्रेकरू हवे आहेत, असे प्रतिपादन भाजप नेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील सेक्टर 6 च्या एम.एन.आर. शाळेसमोर झालेल्या कार्यक्रमात तानाजी पाटील यांच्यासह  शरद जगताप,  म्हलारी सकट, संतोष तावरे, अनिल चव्हाण, कोचेवाड असे सुमारे 250 हून अधिक महिला व पुरुष  कार्यर्त्यांनी याप्रसंगी भाजप मध्ये प्रवेश केला.

कामोठे ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटलेली होती तर सिडकोचे अधिकारी लोकांना सोयीसुविधा दयायला तयार नव्हते म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेची मागणी केली. आता आपले लोकप्रतिनिधी सर्व नागरी कामे पूर्ण करतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

  • पहिली पाच वर्षे आव्हानात्मक-आ. प्रशांत ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार समृद्ध भारतासाठी काम करीत आहेत. आपल्या हयातीतच शेतकरी,कष्टकरी,उद्योजक सर्वच समृद्ध झालेले असतील. गावे,शहरे समृद्ध होतील. नव्याने गठीत झालेल्या पनवेल महापालिकेला पहिली पाच वर्षे आव्हानात्मक आहेत. त्यामुळे तेथे सक्षम उमेदवार निवडून देणे हि मतदारांची जबाबदारी आहे.