नवी मुंबई, 28 एप्रिल 2017/AV News Bureau:
कोपरखैरणे सेक्टर 14 येथील जूनी क्षेपणभूमी शास्त्रीय पध्दतीने बंद करून उभारण्यात आलेल्या निसर्ग उद्यानाजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयामुळे उद्यानात जॉगिंग व विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहाची सविधा उपलब्ध झाली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई मिशन हाती घेत स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने नागरिकांची गरज लक्षात घेऊन निसर्गोद्यानासारख्या वर्दळीच्या ठिकाणी 17 लाख 52 हजार रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. यामध्ये पुरूषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून महिलांकरिता सॅनिटरी वेंडींग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय येथे सोलार सिस्टीम लाईट्स पॉवर बॅकअपची व्यवस्था आहे.
नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते या शौचालयाचे उद्गाटन करण्यात आले. यावेळी कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी, उपअभियंता विवेक मुळ्ये व इतर मान्यवर उपस्थित होते.