ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

मुंबई, 27 एप्रिल 2017/AV News Bureau:

ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू  होते. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. मुंबईतील वरळी स्मशानभूमी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

१९६८ साली ‘मन का मीत’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्णण केले होते. विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते. 1968 ते 2015 या काळात त्यांनी सुमारे 141 चित्रपटांमध्ये काम केले होते. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, कच्चे धागे, अमर अकबर अँथोनी, राजपूत, कुर्बानी, दयावान, कारनामा विनोद खन्ना यांचे गाजलेले चित्रपट आहेत.  विनोद खन्ना यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दरम्यान पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून ते भाजपाचे खासदार होते.

विनोद खन्ना यांच्या निधानाबद्दल मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.

  • हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व गमावले – मुख्यमंत्री

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने आपल्या विविधांगी भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात मोठे योगदान देणारे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. विनोद खन्ना यांनी विविधांगी भूमिका केल्या. खलनायक, नायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका करताना त्यात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यासोबतच भाजपाचे गुरूदासपूरचे खासदार आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. खन्ना यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असणारा कलावंत आपण गमावला आहे.

  • अष्टपैलू अभिनेता हरवलाः खा. अशोक चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने सिनेक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व हरवले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. दमदार अभिनयाने विनोद खन्ना यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी अभिनयासोबतच लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले. दयावान, कुर्बानी, हेरा फेरी, अमर अकबर अँथनी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.  विनोद खन्ना यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या ह्रदयात निर्माण केलेले स्थान नेहमीच अढळ राहील असे चव्हाण यांनी म्हटले.