केंद्रीय मंत्री रामविलास पासवान– मुख्यमंत्री फडणवीस भेट
मुंबई,24 एप्रिल 2017/AV News Bureau:
शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळण्याबरोबरच बाजारामध्ये बाहेरील तूर येऊ नये यासाठी तुरीवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांवरून 25 टक्के एवढी वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे पासवान यांची भेट घेतली. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री सी. आर. चौधरी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते.
तूर खरेदीसाठी दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी (22 एप्रिल) राज्यातील खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पासवान यांच्याकडे केली. केंद्राने याबाबत सकारात्मकता दाखविल्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पासवान यांना सांगितले.
तूर पिकाचे उत्पादन कमी-जास्त झाल्यास त्याची बाजारात कमतरता जाणवून त्याचा परिणाम भाववाढीत होतो. तूर दरात स्थिरता यावी यासाठी दीर्घकालीन धोरण ठरविण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारने राज्यातील तूर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदा एकशे दहा लाख क्विंटलहून अधिक तुरीचे उत्पादन झाले. या तुरीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किंमतीने राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी करण्यात आली. जास्तीत जास्त तुरीची खरेदी होण्यासाठी राज्याने केलेल्या विनंतीला अनुसरून केंद्राने सातत्याने मुदतवाढ दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.