महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,23 एप्रिल 2017/AV News Bureau:
ग्रामीण माणसाला रोजगार व मूलभूत सोईसुविधा पुरविणे ही आजची महत्त्वाची गरज आहे. सहकार क्षेत्राने ही जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना सुखी करण्याची भूमिका बजावावी. ग्रामीण माणसाला नोकरी, व्यवसाय उपलब्ध करुन देऊन त्याच्या पायावर उभे करण्याचे सामाजिक कार्य करावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
‘सहकार भारती’ या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश- दहाव्या अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते येथील सिडनहॅम महाविद्यालयाच्या सभागृहात पार पाडले. त्यावेळी ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे जाळे निर्माण झाले असले तरी सहकाराला आता एक प्रकारची उतरण सुरू झाल्याचे दिसते. याला अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) यासह इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. तरीही सहकारी संस्थांची उतरण थांबवली पाहीजे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, यासाठी यामध्ये तरुणांचा सहभाग वाढला पाहीजे. महाविद्यालयांमध्ये सहकारी संस्था निर्माण करुन तरुणांनी सहकार क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,असे पाटील म्हणाले.
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सहकार भारतीतर्फे देण्यात येणारा स्व. माधवराव गोडबोले पुरस्कार वसंतराव देवधर यांना प्रदान करण्यात आला. अधिवेशनानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच स्व. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्यावर आधारित ‘एकात्म मानव दर्शन’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.