विष्णुदास नाट्यगृहात टेलीक्लाइंबर स्टेजवर पडले
नवी मुंबई,23 एप्रिल 2017 / AV News Bureau:
वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात शनिवारी नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधीच छताला असलेली टेलीक्लाइंबर मशीन कोसळली. मात्र स्टेजवर कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाट्यगृहाच्या दुरूस्ती आणि डागडुजीबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही लक्ष देत नसल्यामुळे भविष्यात कोणाचा तरी जीव जाण्याची वाट नवी मुंबई महापालिका प्रशासन पाहत आहे का, असा सवाल मनसेने केला आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहात २२ एप्रिल २०१७ रोजी “षडयंत्र” या नाटकाचा प्रयोग होणार होता. मात्र प्रयोग सुरु होण्याअगोदर नाट्यगृहातील टेलीक्लाइंबर मशीन स्लॅब वरून स्टेजवर पडले. यामध्ये स्टेजवरील कोणी जखमी झाले नसले तरी या नाट्यगृहाचे संपूर्ण काम नव्याने सुरु करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन कोणाचा तरी जीव गेल्यावर जागे होणार आहे की काय असा सवाल मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रशासनाला विचारला आहे.
नाट्यगृहातील AC प्लांटच्या अवस्थेपासून ते तालीम रूम, स्टेज, रेस्ट रूम पासून ते खुर्च्या या सगळ्याचीच दुर्दशा झाली आहे. डागडुजी न करता नव्याने विकास आराखडा करून या नाट्यगृहाचे काम होणे गरजेचे असल्याची बाब मनसेने सातत्याने मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेने नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर मनपाच्या अभियंता विभागाने नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर केला. मात्र हा विकास आराखडा अंमलात आणायला वेळ का लागतोय, असा सवाल चित्रपट सेना शहर संघटक श्रीकांत माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.