यंदा राज्यात 4 कोटी झाडे लावणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 22 एप्रिल 2017/AV News Bureau:

सर्वसामान्‍य नागरिकांना वनविभागाबाबत प्रेम, आकर्षण निर्माण होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यादृष्‍टीने वनविभागाच्‍या माध्‍यमातुन लोकाभिमुख योजना राबविण्‍याची आवश्‍यकता आहे. 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी विक्रमी वृक्ष लागवड करून महाराष्‍ट्राच्‍या नविभागाने एक वेगळा आदर्श निर्माण केला. आता यावर्षीही 1 जुलै ते 7 जुलै दरम्‍यान 4 कोटी वृक्ष लागवड करण्‍याचा संकल्‍प आपण केला असुन 3 कोटी वृक्ष वनविभागाच्‍या माध्‍यमातुन तर 1 कोटी वृक्ष अन्‍य विभागांच्‍या माध्‍यमातुन लावण्‍याचे नियोजन आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

उत्‍तन भाईंदर येथील रामभाऊ म्‍हाळगी प्रबोधनी आयोजित वरिष्‍ठ वनाधिका-यांच्‍या कार्यशाळेच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

सन 2017-18 च्‍या अर्थसंकल्‍पात वनक्षेत्रात राहणा-या नागरिकांसाठी शंभर टक्‍के एलपीजी गॅस देण्‍यासाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. चेन लिंक फेंसींगसाठी सुध्‍दा आर्थीक तरतूद करण्‍यात आली आहे. अशा विविध योजनेच्‍या माध्‍यमातुन मानव वन्‍यजीव संघर्ष कशा कमी करता येईल, यादृष्‍टीने गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे. असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.