मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई,18 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करावी आणि ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करावी,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली.
जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या मार्गाचे काम तसेच चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
- महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटींची कामे
मुंबईसह राज्यात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरु आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जमीनीच्या भूसंपादनाचे काम जलदगतीने करण्यात यावे. त्यानंतर रेल्वे विभागाकडे जमीनीचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधीत कामाच्या निविदा प्रसिद्ध करणे, प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरु करणे आदी कामांना रेल्वे विभागाने गती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.
- विविध रेल्वे प्रकल्पांचा आढावा
बेलापूर-सीवुडस-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाणपुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गाची निर्मिती, एमयुटीपी टप्पा दोन तसेच टप्पा तीन मधील विविध कामे, इएमयू कोचेस तसेच एसी कोचेस, मुंबई तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, विरार-वसई रोड- पनवेल सबअर्बन कॉरिडॉर, वांद्रे-विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची निर्मिती, जळगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न, आर्वी-वरुड दरम्यान नवीन मार्गाचे सर्वेक्षण करणे, कोकण रेल्वेच्या रोहा-वीर दरम्यान ट्रॅक डबलींग करणे, डीडीसीसीआयएलएल प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
- कसारा स्थानकाबाहेर एसटी बसस्थानक
मुंबई उपनगर परिसरातील प्रवासी कसारा रेल्वे स्थानकावर उतरून तेथून पुढे वाहनाने नाशिक, शिर्डी, अहमदनगर इत्यादी ठिकाणी जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कसारा उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी महामंडळाचे बसस्थानक उभारल्यास प्रवाशांची मोठी सोय होऊ शकेल. यासाठी रेल्वेने एसटी महामंडळाला जागा द्यावी, अशी मागणी यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या बदल्यात नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे रेल्वे विभागाला हवी असलेली एसटी महामंडळाची जागा हस्तांतरीत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात तातडीने पडताळणी करुन निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश प्रभू यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.