हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार– नितीन गडकरी
मुंबई, 17एप्रिल 2017/AV News Bureau:
मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रकल्पाच्या एक टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
केंद्र शासनाच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई- गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20 हजार कोटीचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 कि.मी. लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करुन 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे. जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महामार्गांवर नदीवरील पुलांचे बांधकाम करताना हे पूल बॅरेजेस म्हणून रुपांतरित करण्यासाठी त्याप्रमाणे आराखडे तयार करावेत. पाणीटंचाईच्या काळात हे पुलाचे बॅरेजेस उपयुक्त ठरतील. मराठवाडा, विदर्भात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीसाठी मुरुम तसेच मातीची गरज भासते. अशा वेळी स्थानिक शेतकऱ्यांना विनामूल्य शेततळे खोदून देऊन तेथील मुरुम या कामासाठी घेतल्यास शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण, नवीन लागवड आणि सौंदर्यीकरणाचे काम स्थापत्य काम करणाऱ्या कंत्राटदारांना न देता त्या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था व कंपन्यांनाच दिले जावे. वृक्ष पुनर्रोपणाचे धोरण तयार करुन ते केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
- कोकण पर्यटन सागरी महामार्ग
गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू- वसई- अलिबाग- श्रीवर्धन- दाभोळ- गणपतीपुळे- रत्नागिरी- देवगड- मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱ्याशेजारुन जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा डीपीआरही जवळपास पूर्ण झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया 31 मे 2017 पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देण्यात यावेत, अशाही सूचनाही गडकरी यांनी दिल्या.
- सावित्री नदीवरील पुलाचे पाच जूनला लोकार्पण
महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण पाच जूनला करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.