पाकिस्तानसोबतची सागरी बैठक रद्द

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2017:

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा भारतीय नौदलाने जोरदार निषेध केला आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुढील आठवड्यात पाकिस्तानसोबत होणारी सुरक्षा बैठक रद्द केली आहे.

कुलभूषण जाधव हे हेरगिरी करीत असल्याचा आरोप करीत पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मात्र पाकिस्तानची ही कारवाई अतिशय चुकीची असून जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने केली आहे. परंतु पाकिस्तानने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. यापार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबत होणारी सागरी सुरक्षा बैठकच रद्द केली आहे. पाकिस्तानी शिष्टमंडळ आज दिल्लीत या बैठकीसाठी दाखल होणार होते. मात्र संरक्षण मंत्रालयाने या प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्याला मंजूरी दिली नसल्यामुळे ही बैठक होणार नसल्याचे समजते.