उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
बोर्ली मांडला, 15 एप्रिल 2017:
अलिबाग समुद्रकिनारी अलिबाग बंदर अधिकारी कार्यालयाजवळ समुद्र किना-याच्या बंधा-याचाला खेटून बांधकाम केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रादेशीक बंदर अधिकारी महाराष्ट् मेरीटाईम बोर्ड यांना दिले आहेत.
अलिबाग बंदर अधिकारी कार्यालयाजवळ समुद्र किनाऱ्यापासून ५० फुटाच्या आत बांधकाम सुरू आहे. याप्रकरणी तक्रारदार संजय सावंत यांनी ४ एप्रिल २०१७ रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना इमेलद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीत समुद्र किनाऱ्यापासून ५० फुटांच्या आत सुरू आहे. हे बांधकाम मळई जमिनीमध्ये असून सीआरझेड अधिसूचना १९९१ चा भंग करीत असल्याचे सावंत यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
अलिबाग समुद्रकिनारी अलिबाग बंदर अधिकारी कार्यालयाजवळ समुद्र किना-याच्या बंधा-याचाला खेटून महसूल व बंदर खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या जागेमध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविण्याची मागणी अलिबाग येथील रहिवाशी अश्रफ घट्टे यांनी केली होती. ही माहिती सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी या तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक बंदर अधिकारी, राजपुरी बंदरे समूह, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्याकडे विचारणा केली आहे. तसेच याप्रकरणी त्वरीत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून विषयाधीन बांधकामाबाबत सखोल चौकशी करावी आणि चौकशीअंती सदर बांधाकामाविरोधात उचित कारवाई करण्याबाबत संबंधित विभागास कळवावे . तसेच या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्यालयास सादर करावा, असे लेखी कळविले आहे.