नवी मुंबई, 13 एप्रिल 2017/AV News Bureau:
पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या जुईनगर, सानपाडा परिसरातील विक्रेत्यांविरोधात व्यापक कारवाई करीत नवी मुंबई महापालिकेने 30 हजारांचा दंड वसूल केला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या विक्रेत्यांकडे असलेला प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करणे व त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्याची मोहीम महापालिका नियमितपणे हाती घेते. आज जुईनगर आणि सानपाडा भागातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या 4 दुकानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच 5 दुकानातील प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. अशाप्रकारे एकूण 8 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
त्याचप्रमाणे सार्वजनिक जागेचा वापर करणाऱ्या गॅरेजवर कारवाई करून 15 हजार 200 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.