मुंबई 12 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 900 आंतरजिल्हा बदली प्रस्तावांना ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने मध्यावधी बदल्या थांबविल्या होत्या. तसेच बऱ्याच जिल्हा परिषदांकडून चुकीची कार्यपध्दती अनुसरून आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिली जात होती. त्यामुळे शासनाने डिसेंबर 2016 नंतर कोणत्याही शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र न देणेबाबत स्पष्ट आदेश दिले होते. शासन स्तरावरून आता आंतरजिल्हा बदलीबाबत नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याचा आदेश निघणार आहे.
बदलीने जाण्यास इच्छूक असलेल्या शिक्षकांना ज्या जिल्हा परिषदांनी 31 डिसेंबर 2016 पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, अशाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून कार्यमुक्तीचे आदेश 15 एप्रिल 2017 रोजी काढण्यात यावेत असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. प्रत्येक जिल्हयाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांचे आदेश तयार करून संबंधित शिक्षकास कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदेला उपरोक्त कालमर्यादेत पाठविण्याची कार्यवाही करावी. आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदांनी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश 20 एप्रिल 2017 पर्यंत काढावेत. या आदेशात प्रत्यक्षात कार्यमुक्तीचा दिनांक 8 मे 2017 रोजी असेल असे स्पष्टपणे नमुद करावे असेही या आदेशात म्हटले आहे.