मुंबई, 12 एप्रिल 2017/AV News Bureau:
जॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले यांची ‘queen मेकर’ ही नाट्यकलाकृती येत्या १६ एप्रिलरोजी रंगमंचावर येणार आहे. ‘Queen मेकर’ च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील एक वेगळा विषय रंगमंचावर सादर केला जाणार आहे. यापूर्वी ‘कळत नकळत’ आणि नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे दोन वेगळे विषय जॉय भोसलेंनी रंगमंचावर सादर केले होते.
अभिनेते राजन ताम्हाणे यांनी ‘Queen मेकर’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘Queen मेकर’ हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱ्याच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल. हे नाटक म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वृत्तीवर बोट ठेवणारा एक प्रयोग आहे. या नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे सोबतच एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहेत.
‘Queen मेकर’ ची कथा लेखक रवि भगवते यांची असून प्रदिप मुळ्ये यांचं नेपथ्य लाभलं आहे. नाटकाचं संगीत परिक्षित भातखंडे व प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर तर सूत्रधार गोट्या सावंत हे आहेत.