शेतकरी कर्जमाफीपेक्षा विधीमंडळातील खांदेपालट अधिक महत्वाची का  ?

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

मुंबई,6 एप्रिल 2017/AV News Bureau:

शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र पेटून उठला असताना शिवसेना विधिमंडळात खांदेपालटाची खलबते करण्यात व्यस्त आहे. शिवसेनेला हा विषय शेतकरी कर्जमाफीपेक्षा अधिक महत्वाचा वाटतो का? अशा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

एकिकडे उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्याचा शब्द केंद्र सरकारने भाजप-शिवसेनेच्या दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाला दिला होता. परंतु त्यांनी तो शब्द फिरवला आहे. महाराष्ट्रात  शिवसेनेने आपले संपूर्ण लक्ष मंत्र्यांमध्ये फेरबदल करण्यावर केंद्रित केले आहे. विधानमंडळात नावापुरता शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करायचा अन् नंतर निमूटपणे बसून रहायचे, अशी शेतकरीविरोधी भूमिका शिवसेनेने घेतल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राज्यातील शेतकरी शिवसेनेच्या या प्रतारणेची योग्य दखल घेतील, असा इशारा त्यांनी दिला.