विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका
मुंबई, 5 एप्रिल 2017/AV News Bureau:
उत्तर प्रदेशातलं भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर 15 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करतं, महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला अडीच वर्षानंतरही कर्जमाफी जाहीर करता येत नाही, दोन राज्य सरकारांच्या भूमिकांमध्ये हा फरक का ? असा प्रश्न विचारत उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्याची वेळ यावी हे महाराष्ट्राचे आणि इथल्या जनतेचे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
विधानपरिषदेत नियम 289 अन्वये उपस्थित शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसंदर्भातील चर्चेत सहभागी होताना मुंडे यांनी सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या भूमिकेवर टीका केला. मुख्यमंत्री योग्यवेळी कर्जमाफी देऊ असं वेळोवेळी सांगतात, परंतु शेतकरी दररोज मरण असताना मुख्यमत्र्यांची योग्य वेळ कधी येणार ? मुख्यमंत्री पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत की, कर्जमाफीचा 30 हजार कोटींचा भार कमी करण्यासाठी त्यांना आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश,तामिळनाडूसारख्या तुलनेत गरीब राज्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर आता, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरप्रदेश व तामिळनाडू सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्तसचिवांना दिले आहेत. कधीकाळी सामाजिक, प्रशासकीय व्यवस्थेत, निर्णयप्रक्रियेत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रावर, उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्याची वेळ यावी, हे या राज्याचे व इथल्या जनतेचं दुर्दैवं असल्याचे मुंडे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या सर्वपक्षीय संघर्षयात्रेची मुख्यमंत्री व सरकारमधील भाजप नेत्यांनी खिल्ली उडवल्याबद्दल मुंडे यांनी संताप व्यक्त केला.’संघर्ष यात्रें’चं पेटंट आपल्याकडे असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते वक्तव्यं करत आहेत. परंतु भाजपच्या संघर्ष यात्रेत किती वातानुकूलित गाडया होत्या. त्या कुणी वापरल्या व कोणत्या पंचतारांकित हॉटेलात कुणकुणाचे वास्तव्य होते, याची माहिती आपल्याकडे आहे, ती उघड करायला लावू नका, असा इशाराही मुंडे यांनी दिला.