मुंबई, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडियोच्या बॅनरखाली या माहितीपटाचे चित्रीकरण होत आहे. योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य हे तीन निर्माते या माहितीपटाला लाभले आहेत. या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करीत आहेत.
मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषेमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले. अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करताच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला. अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांसोबत गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करीत आहे. अशा या नटश्रेष्टाच्या कारकीर्दीचा आढावा माहितीपटातून घेतला जाणार आहे.
शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे. या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांकडून त्यांचा जीवनप्रवास कथन केला जाणार आहे. स्वतः विक्रम गोखले देखील हे सुद्धा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करणार आहेत. हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.