अवैध प्रवासी वाहतूक : 4072 वाहनांवर कारवाई

दंड आणि करापोटी  सुमारे साडे तीन कोटी वसूल

मुंबई, 1 एप्रिल 2017/AV News Bureau:

मुंबई,ठाणे, पनवेल, बोरिवली आणि वाशी प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या अखत्यारित एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 या काळात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 हजार 72 वाहनांवर कारवाई करून दंड आणि करापोटी सुमारे 3 कोटी 46 लाख रुपयांची वसूली करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई शहरातून रात्री आणि दिवसा निघणाऱ्या सुमारे 200 च्या आसपास खासगी लक्झरी बसेस नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर आणि ठाणे येथील तीन हात नाका आदी ठिकाणी थांबून प्रवासी वाहतूक करतात. याबाबतचा तारांकीत प्रश्न संजय दत्त यांनी उपस्थित केला होता. यावर रावते यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील टप्पापद्धतीने प्रवासी वाहतुकीचे अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहे. असे असले तरी  मोटार वाहन कायद्यानुसार खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना कंत्राटी प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला जातो. मात्र अनेकदा बेकायदेशीर प्रवासी वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यास वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई केली जाते. त्याअंतर्गत एप्रिल 2016 ते यावर्षी फेब्रुवारी 2017 या काळात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या 33 हजार 662 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 हजार 789 वाहने दोषी आढळून आली. त्यातील 4 हजार 72 वाहनांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि त्यांच्याकडून 1 लाख 33 लाख 44 हजार रुपयांचा दंड आणि 2 कोटी 12 लाख 53 हजार रुपये इतका कर वसूल करण्यात आल्याचे रावते यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.