शिधावाटपासाठी आता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर

मुंबई, 30 मार्च २०१७ /AV News Bureau:

मुंबईत शिधापत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 28 हजार बोगस शिधापत्रिका आढळून आले आहेत. त्यातील 55 हजार शिधापत्रिका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. रेशन व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने रेशन देण्यात येणार आहे. लवकरच बायोमेट्रिक यंत्रणा राबवली जाणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत दिली.

भुसावळ (जि. जळगाव) येथील बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर कारवाईसंदर्भात विधानसभा सदस्य डॉ. संजय रायमूलकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या तक्रारींची शासनाने दखल घेऊन कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी जिल्ह्याबाहेरच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका महिन्यात भुसावळ येथे बैठक घेण्यात येईल. रेशनमधील गैरप्रकारासाठी सरकारने 22 लोकांना मोक्का आणि 40 लोकांना ‘एमपीडीए’अंतर्गत  कारवाई केली असल्याचेही बापट यांनी सांगितले.