7 पेट्रोल पंप जप्त; 6 वितरकांविरोधात खटले
मुंबई, 30 मार्च 2017 /AV News Bureau:
वाहनचालकांना पेट्रोल देताना मापात पाप करणाऱ्या राज्यभरातील पेट्रोल पंपांविरोधात मार्च महिन्यात वैध मापन शास्र यंत्रणेने जोरदार मोहिम राबविली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तब्बल 253 पेट्रोलंपपांवर कारवाई केली. तर 7 पेट्रोल पंप जप्त करून 6 वितरकांविरोधात खटले दाखल करण्यात आले. तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 17 खटलेही नोंदविण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पेट्रोल पंपधारकांकडून पेट्रोल, डिझेल देताना फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याची गंभीर दखल वैध मापन शास्र विभागाने घेतली आहे. त्यानुसार राज्यभरातील 1 हजार 636 पेट्रोल- डिझेल वितरकांच्या 11हजार418 पेट्रोल पंपाची तपासणी केली. यामध्ये दोषी आढळलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती वैध मापन शास्त्र विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी अविरत वाटचाल न्यूजशी बोलताना दिली.
विभागनिहाय कारवाई केलेले पेट्रोलपंप –
- मुंबई विभाग
मुंबई महानगर विभागामध्ये 145 वितरकांचे 1 हजार 734 पेट्रोल पंप तपासण्यात आले. यामध्ये कमी इंधन दिल्याप्रकरणी 2 पंप बंद करून एका वितरकाविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. तर 41 पेट्रोल पंप त्रुटीमुळे नोटिसा देवून बंद करण्यात आले आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी मे. चारकोप पेट्रोलियम, महावीर नगर, कांदिवली या वितरकाचा समावेश आहे.
- कोकण विभाग
या विभागात 160 वितरकांच्या 1 हजार 202 पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कमी इंधन दिल्याप्रकरणी 1 पंप बंद करून वितरकाविरोधात खटला दाखल केला आहे. तर 30 पेट्रोल पंप त्रुटीमुळे नोटिसा देवून बंद करण्यात आले आहेत. भिवंडी तालुक्यातील मे. जाई ऑटोमोबाइल्स, देहाले या वितरकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
- पुणे विभाग
या विभागात 377 वितरकांच्या 2 हजार 511 पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कमी इंधन दिल्याप्रकरणी 2 पंप बंद करून 2 वितरकांविरोधात खटला दाखल केला आहे. तर 17 पेट्रोल पंप त्रुटीमुळे नोटिसा देवून बंद करण्यात आले आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी मे. सिद्धी विनायक पेट्रोलियम, सांडगेवाडी, जि. सांगली आणि मे. डेडीया सेल्स सिंडीकेट, अंकली, सांगली यां वितरकांविरोधात कारवाई करण्यात आली.
- नाशिक विभाग
नाशिक विभागात 322 वितरकांचे 2 हजार पेट्रोल पंप तपासण्यात आले. त्यापैकी पंपातील त्रुटीमुळे 99 पेट्रोल पंपांना नोटिसा देवून बंद करण्यात आले. तर कमी पेट्रोल दिल्याप्रकरणी 2 पंप बंदू करून 2 वितरकांविरोधात खटले नोंदविण्यात आले आहेत. मे. गुरुदत्त ऑटोसर्व्हीस, मळसाणे, मुंबई आग्रा रोड, वडाळी भोई आणि मे. साईराज पेट्रोलियम, सिन्नर एमआयडीसी, नाशिक-पुणे रोड यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
- औरंगाबाद विभाग
औरंगाबाद विभागात 290 वितरकांचे 1 हजार 661 पेट्रोल पंप तपासण्यात आले. त्यापैकी पंपातील त्रुटीमुळे 27 पेट्रोल पंपांना नोटिसा देवून बंद करण्यात आले.
- अमरावती विभाग
अमरावती विभागात 180 वितरकांचे 1 हजार 181 पेट्रोल पंप तपासण्यात आले. त्यापैकी पंपातील त्रुटीमुळे 21 पेट्रोल पंपांना नोटिसा देवून बंद करण्यात आले.
- नागपूर विभाग
नागपूर विभागात 162 वितरकांचे 1 हजार 129 पेट्रोल पंप तपासण्यात आले. त्यापैकी पंपातील त्रुटीमुळे 17 पेट्रोल पंपांना नोटिसा देवून बंद करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या पेट्रोल पंपांची पुर्नपडातळणी आणि मुंद्रांकन केल्यानंतर वापरासाठी ते पुन्हा खुले करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
तक्रार कशी करायची
पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाच्या खात्रीसाठी प्रत्येक पंपावर 5 लीटर क्षमतेचे प्रमाण माप ठेवणे बंधनकारक आहे. जेव्हा 5 लिटर इंधन दिले जाते. तेव्हा त्यामध्ये 25 मि.लि. घट वा त्रुटी ग्राह्य धरली जाते. मात्र त्यापेक्षा अधिक घट आढळून आल्यास वैध मापन शास्र विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही गुप्ता यांनी केले आहे.