ग्रामसेवक पदासाठी पदवी आवश्यक

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबई, २९ मार्च 2017 /AV News Bureau:

ग्रामसेवक पदासाठी उच्च शिक्षित उमेदवार उपलब्ध होण्यासाठी किमान अर्हता विद्यापीठाची पदवी ठेवण्याची शिफारस स्विकारण्यात आल्याची माहिती ग्रामविकासमत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांचे सेवाप्रवेश नियमाचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. नियुक्त केलेल्या अभ्यासगटाच्या शिफारशीनुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनांनुसार वय, आरक्षण इ. सर्वसाधारण अटी निश्चित करण्याचे व शैक्षणिक अर्हतेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

ग्रामसेवक पदासाठीच्या पात्रतेबाबत दि.२५ ऑगस्ट २०११ च्या अधिसूचनेनुसार उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत ६०% गुणांची अट होती. अभ्यासगटाने ग्रामसेवक पदासाठी तलाठ्याच्या धर्तीवर कोणत्याही शाखेची पदवी अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ग्रामसेवक पदासाठी उच्च शिक्षित उमेदवार उपलब्ध होण्यासाठी किमान अर्हता विद्यापीठाची पदवी ठेवण्याची शिफारस स्विकारण्यात आली आहे.  नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक्तीचे प्रमाणे मंजूर पदाच्या १०० टक्के राहील, असे मुंडे यांनी सांगितले.

 ग्रामविकास अधिकारी पदासाठीचे नियमामध्ये ग्रामसेवक पदावर अखंड ३ वर्षे सेवा पूर्ण केली आहे अशा पात्र ग्रामसेवकांना पदोन्नती देवून किंवा ज्यांनी  ग्रामसेवक पदावर ३ वर्षे अखंड सेवा केली अशा व्यक्तीमधून संबंधित विभागीय आयुक्ताद्वारे घेण्यात येणाऱ्या व त्या प्रयोजनार्थ शासनाने विहित केलेल्या मर्यादित स्पर्धात्मक परिक्षेच्या आधारे निवडीने नियुक्ती करण्यात येईल.  नियमित पदोन्नती व मर्यादित स्पर्धा परिक्षेच्या आधारे करावयाच्या नियुक्तीचे प्रमाणे अनेक्रमे ७५:२५ इतके राहील असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

विस्तार अधिकारी या पदावरील नियुक्ती ही ३ वर्ष अखंड सेवा केली आहे अशा पात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून किंवा जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या व ज्यांची सेवा सलग ३ वर्ष झाली आहे अशा ग्रामविकास अधिकाऱ्यामधून विभागीय आयुक्तांद्वारे घेण्यात येणाऱ्या व त्या प्रयोजनार्थ शासनाने विहित केलेल्या मर्यादित स्पर्धात्मक परिक्षेच्या आधारे निवडीने नियुक्त करण्यात येईल किंवा जे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह धारण करीत असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल.  पदोन्नतीद्वारे, निवडीद्वारे व नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक्तीचे प्रमाणे ५०:२५:२५ असे राहील असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.