नवी मुंबई,23 मार्च 2017/AV News Bureau:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 22 मार्च रोजी झालेल्या जागतिक पाणी दिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 16 मार्च 31 मार्च या पंधरवड्यात नवी मुंबईतील सर्व जलाशयांची (नदी, जलाशय,तलाव, खाडीमुख ) साफसफाई करण्याकरीता विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज नेरूळ आणि घणसोली विभागात जनजागृती करण्यात आली.
नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातील डी. वाय. पाटील कॉलेज विद्यार्थी व नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.12, शिरवणे या विद्यार्थ्यांच्या सोबत जलप्रतिज्ञा घेऊन पाण्याचा अपव्यय टाळणे, पाणी जपून वापर करावा याबाबत परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. तसेच प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य हे तलाव, खाडीमध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबधी परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी मार्गदर्शन केले. तसेच घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील सेक्टर-12, साईबाब मंदीर येथील जेटी व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. खाडी परिसराची मोठया प्रमाणात साफसफाई करुन निर्माल्य, प्लास्टीकच्या पिशव्या, कचरा हे खाडीमध्ये न टाकण्यासंबधी मार्गदर्शन करण्यात आले.