उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 22 मार्च 2017/AV News Bureau:

उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लोकांच्या सूचना, हरकती लक्षात घेऊनच या शहराचा विकास आराखडा अंतिम करण्यात येईल. शहराचा सर्वांगीण विकास होईल यादृष्टीने हा आराखडा अंतिम करुन विकासकामे करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

उल्हासनगर विकास आराखड्याबाबत आज विधानभवन येथे मुख्यमंत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहरांचा विकास करताना केवळ काँक्रीटचे जंगल तयार करुन उपयोग नाही. शहर हे लोकांना राहण्यास सुसह्य असायला हवे. उल्हासनगरचा विकासही अशाच पद्धतीने करण्यात येईल. यासाठी उल्हासनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून लोकांच्या हरकती, सूचना लक्षात घेऊनच त्यास अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.