राष्ट्रवादी कडून परभावास कारणीभूत असणा-यांवर लवकरच कठोर कारवाई :अजित पवार
मुंबई, 22 मार्च 2017/AV News Bureau:
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाशी व मतदारांना फसवणा-यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिली.
बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातला पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीनं झटत असताना व त्याच्या परिश्रमावर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना पक्ष उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते व मतदारांच्या जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात पक्षभावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया मी कदापीही सहन करणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. माझ्या सांगण्यावरुन त्यांनी तो निर्णय घेतला, असा दावा जर कुणी करीत असेल, तर ते जनतेची, मतदारांची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत असल्याचे पवार म्हणाले.