वनंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई 20 मार्च 2017/AV News Bureau :
निसर्गातील जैवविविधता तसेच अन्न साखळी शाबूत राहण्याच्या दृष्टीने चिमण्यांची पर्याप्त संख्या टिकवून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृत्रिमरित्या प्रजनन करण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
- पहिला टप्पा
चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सेमिनरी हिल्स नागपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, रामबाग वन वसाहत चंद्रपूर, वन वसाहत औरंगाबाद या ठिकाणांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. या ठिकाणी चिमण्यांच्या आढळाबाबत सर्वेक्षण करणे, कृत्रिम घरटी बसविणे, कोनाडे तसेच वळचणी उपलब्ध करणे, बी एन एच एस किंवा इतर तज्ज्ञ यंत्रणांशी सल्लामसलत करून चिमण्यांना खाद्य उपलब्ध करणे, घरट्यांसाठी जागा मिळावी या दृष्टीने मडबाथ, जैविक कुंपण तसेच गवत उपलब्ध करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- तर कृत्रिम प्रजनन
पहिल्या टप्प्यातील उपक्रमांमुळे जर चिमण्यांच्या संवर्धनात अनुकूल परिणाम प्राप्त झाला तर या उपक्रमाची इतरत्र पुनरावृत्ती करण्यात येईल आणि जर अपेक्षित परिणाम प्राप्त झाला नाही तर कृत्रिम प्रजननाचा अवलंब करावा लागेल ज्यामध्ये प्रजनन, पिंजरे, अंडी उबवणे आदी उपक्रमांचा समावेश असेल. यासाठी केंद्रीय प्राणी प्राधिकरण तसेच राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची मान्यता घेण्यात येईल असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.