मुंबई, 19 मार्च 2017 /AV News Bureau:
राज्यातील विविध मार्गांवर शासनाने परवानगी दिलेल्या हॉटेलांमध्ये 30 रुपयांत चहा आणि अल्पोपहार न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
राज्यातील विविध मार्गांवर प्रवाशांना जेवण आणि अल्पोपहार मिळावा यासाठी 27 ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या थांब्यांवर परिवहनच्या बसेस थांबतात. त्यामुळे या थांब्यांबाबत करार करताना हॉटेलचालकांना खाद्य पदार्थांचे दरपत्रक ठळकपणे लावणे आणि 30 रुपयांमध्ये चहासोबत अल्पोपहार देण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र मुंबई-पुणे मार्गावरील फूडमॉल, पुणे-भोर-महाड मार्गावरील हॉटेल आयुषा आणि पुणे-नाशिक मार्गावरील हॉटेल इंद्रप्रस्थ यांनी प्रवाशांना 30 रुपयांत चहा आणि अल्पोपहार दिला नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने त्यांचा थांबा रद्द करण्यात आल्याचे रावते यांनी आपल्या उत्तरात सांगतिले. याबाबतचा तारांकीत प्रश्न सुजितसिंग ठाकूर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.