विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र
मुंबई, 18 मार्च 2017/AV News Bureau:
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची ‘पारदर्शक’ फसवणूक झाली असून, कर्जमाफीऐवजी केवळ आश्वासनांची ‘गाजरे’ मिळाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले तर विश्वासघात मिळाला, फसवणूक मिळाली, प्रतारणा मिळाली, अपेक्षाभंग मिळाला, यु-टर्न मिळाला, वचनभंग मिळाला आणि आश्वासनांची गाजरे मिळाली. सभागृहात शेतकरी कर्जमाफीसाठी टाळांचा गजर सुरू होता. परंतु, अर्थमंत्र्यांनी बळीराजाच्या स्वप्नाला हरताळ फासल्याचे विखे पाटील म्हणाले.
2016-17 च्या अर्थसंकल्पात हे वर्ष ‘शेतकरी स्वाभिमान वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र 2016 मध्ये 3 हजारांहून अधिक तर 2017 च्या पहिल्या 2 महिन्यात सुमारे 400 शेतकरी आत्महत्या झाल्या. या सरकारने शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी काहीही दिले नाही. कर्जमाफी देण्याचे आपलेच आश्वासन देखील ते पाळू शकले नाहीत, याचे स्मरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दिले.
केंद्र सरकारकडून नेमके काय मागायचे, याचा कोणताही ठोस प्रस्ताव तयार न करताच हे शिष्टमंडळ केवळ डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीला गेले. उत्तर प्रदेशचे कोणतेही शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही. पण् त्या राज्यात शेतकरी कर्जमाफी होणार असल्याची घोषणा स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लोकसभेत केली. दुसरीकडे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दिल्लीला गेल्यावर त्यांना मात्र केवळ आश्वासनच मिळाले,अशी टीकाही त्यांनी केली.