मोदी लाट कायम, काँग्रेसलाही दिलासा

bjp-cong

उत्तरप्रदेश, उत्तराखंड भाजपकडे तर पंजाब काँग्रेसकडे 

मणिपूर, गोव्यात भाजप- काँग्रेसमध्ये चुरस

मुंबई, 11 मार्च 2017 /AV News Bureau:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने जोरदार मुसंडी मारत उत्तर प्रदेशमध्ये इतिहास रचला आहे. 403 पैकी तब्बल 312 जागा पटकावत सपा-काँग्रेस आघाडीला भुईसपाट केले आहे. त्याशिवाय उत्तराखंडमध्ये भाजपचेच कमळ फुलले आहे. एकीकडे भाजपची ही घोडदौड सुरू असताना पंजाब काँग्रेसच्या हातात गेली असून गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसून येत आहे.

पाचपैकी ४ राज्यांमध्ये भाजपचे सरकार येईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तर उत्तरप्रदेशसह विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले घवघवीत यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पंजाबमधील विजयाबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये मिळेलेल यश  अभूतपूर्व असून हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढविली.मात्र दोघांना केवळ 54 जागांवर समाधान मानावे लागले असून त्यामध्ये काँग्रेसच्या केवळ 7 जागा आहेत. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादवयांनी पदाचा राजिनामा दिला आहे.

up

उत्तर प्रदेशात पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप – 3 कोटी 44 लाख 3 हजार 39 (39.7%)

काँग्रेस – 54 लाख 16 हजार 324 (6.2%)

सपा -1 कोटी 89 लाख23 हजार689 (21.8 %)

बसपा – 1 कोटी 92 लाख 81 हजार352 (22.2%)

पुन्हा निवडणूक घ्या –मायावती

लखनऊ : भाजपने उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या पक्षांना धूळ चालत तीन आकडी विजयी जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे भाजपची घोडदौड रोखण्यासाठी सज्ज झालेल्या काँग्रेस- समाजवादी पक्षांना हादरा बसला आहे. बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपवर जोरदार टीका करीत मतदान यंत्रांमध्ये घोळ करून विजय मिळवल्याचा आरोप केला आहे. तसेच EVM  वर आक्षेप घेत मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील यश हे मोदींचे महायश – आठवले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे अभूतपूर्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र  सरकारच्या कामाचे  महायश आहे असे प्रतीक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली .  उत्तर प्रदेशातील दलित मतदारांनी बसपाला स्पष्ट नाकारले असून सपा काँग्रेसचाही सफाया झाला आहे

*सपा -बसपा- काँग्रेस ची झोळी झाली खाली*

*आणि भाजपची विजयाच्या रंगाने  रंगविली  होली*

*मोदींनी केली आहे  मोठी कमाल*

*आता युपी च्या विकासाची होईल धमाल*

अश्या आपल्या खास शैलीत आठवले यांनी  उत्तर प्रदेश च्या विधानसभा निकालावर प्रतिक्रिया दिली आहे

पंजाब

पंजाबमध्येही भाजप आणि आपची हवा होती. मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 12 वर्षानंतर राज्यात मोठे यश मिळवले आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमरिंदर सिंग हे पटियालामधून विजयी झाले आहेत. तर मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल हे लांबी मतदारसंघातून पराभूत झाले आहे.

pnjb

पंजाबमध्ये पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप – 8 लाख 33 हजार 92 (5.4%)

काँग्रेस – 59 लाख 45 हजार 899 (38.5%)

आम आदमी पक्ष – 36 लाख 62 हजार 665 (23.7%)

शिरोमणी अकाली दल – 38 लाख 98 हजार 161 (25.2%)

लोक इन्साफ पार्टी – 1 लाख 89 हजार228 (1.2%)

गोवा

गोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस आहे. 40 पैकी 17 जागांवर काँग्रेसने तर 13 जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची कोणाला साथ मिळणार यावरच काँग्रेस आणि भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. हा पराभव मनोहर पर्रिकर यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

goa

गोव्यामध्ये पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप : 2 लाख 97 हजार 588 (32.5 %)

काँग्रेस : 2 लाख 59 हजार 758 (28.4%)

महाराष्ट्रवादी गोमांतक : 1 लाख 3 हजार 290 (11.3%)

गोवा फॉरवर्ड पक्ष : 31 हजार 900 (3.5%)

अपक्ष :1 लाख 1 हजार922 (11.1%)

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. विरोधकांना चारीमुंड्या चित करीत भाजपने 70 पैकी  57  जागा पटकावल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पदाचा राजिनामा दिला आहे.

uttarakhand

उत्तराखंडमध्ये पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप – 23 लाख 12 हजार 912 (46.5%)

काँग्रेस – 16 लाख 65 हजार 664 (33.5%)

अपक्ष – 4 लाख 99 हजार 625 (10.0%)

मणिपूर

manipur

मणिपूरमध्ये पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप – 6 लाख 1 हजार 527 (36.3 %)

काँग्रेस – 5 लाख 81 हजार 869 (35.1%)

तृणमूल काँग्रेस -23 हजार 384 (1.4%)

नागा पिपल्स फ्रंट -1 लाख 18 हजार 850 (5.1%)

लोक जनशक्ती पार्टी -42 हजार 263 (2.5%)

नॅशनल पिपल्स पार्टी – 83  हजार 744 (5.1%)

अपक्ष – 83 हजार 834 (5.1%)

 

2024 मध्येच बघू- जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला 

 पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपने विरोधकांना चांगलेच नामोहरण केले आहे. भाजपला मिळालेल्या कौलाने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच आश्चर्यचकीत झाले आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून देशात अशीच भाजपची लाट राहीली तर 2019 सोडा 2024 साठीच तयारी करायला हवी, असे म्हटले आहे.