बारावीच्या पेपरफुटीमागे मुख्याध्यापक

 

पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक

नवी मुंबई, 11 मार्च 2017/ AV News Bureau:

बारावीच्या पेपर फुटीप्रकरणी एक टोळीच सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीमध्ये विरार येथील पालघर माउंट मेरी शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेवून पेपर फोडीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान शाळेचा मुख्याध्यापकच या प्रकरणात प्रमुख आरोपी असल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर 2 मार्च रोजी मराठीचा आणि 4 मार्च रोजी सेक्रेटरीयल प्रॅक्टीस या विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अपवरून प्रसारीत करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करीत अझरुद्दीन कमरुद्दीन शेख, राहुल बच्छेलाल भास्कर (दोघेही राहणार मालाड) हे एसवायबीकॉमचे विद्यार्थी, शेख मो. अमन मो. इस्लाम (राहणार कांदिवली) बारावीचा विद्यार्थी आणि खासगी क्लासेसचा शिक्षक असणारा सुरेश विमलचंद झा यांना 6 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास करीत 11 मार्च रोजी इतर आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये विरार येथील पालघर माउंट मेरी शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक आनंद रामदास कामत (43), शाळेचा हेड क्लार्क गणेश सुधाकर राणे (30), वकील आणि खासगी शिकवणी क्लासेसचा चालक असणारा अड. निखील शंकर राणे (29) तसेच नालासोपारा येथील शिक्षण आणि खासगी क्लासेसचा चालक असणाऱ्या विनेश अशोक धोत्रे (27) यांना अटक करण्यात आली आहे.

आनंद कामत आणि गणेश राणे हे त्यांच्या शाळेत प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका संचांचे पाकिट उघडून प्रश्नपत्रिकांचे मोबाइलवर फोटो काढून ते अड. निखील राणे याला पुरवित असे. राणे हा हे प्रश्नपत्रिकांचे फोटो विनेश धोत्रे याला व्हॉट्स अपवर पाठवित असे. धोत्रे हे फोटो विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपकडून पैसे स्वीकारून त्यांना व्हॉट्स अपद्वारे प्रश्नपत्रिकेच्या पानांचे फोटो पुरवित असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती नवी मुंबई सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पत्रकारांना दिली.